मेलबर्न - 'आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन झाले तर, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर त्यात भाग घेईल', असे मत वॉर्नरच्या व्यवस्थापकांनी (मॅनेजर) व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतरही वॉर्नर या निर्णयावर ठाम असेल असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - कोरोनासंदर्भात विरूष्काचा 'मंत्र' व्हायरल...पाहा व्हिडिओ
वॉर्नरचे व्यवस्थापक जेम्स अर्स्किन यांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. 'आयपीएल आयोजित झाल्यास डेव्हिड वॉर्नरला त्यामध्ये खेळायला आवडेल', असे अर्स्किन यांनी सांगितले. कोरोनाच्या धोक्यामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सद्य परिस्थिती पाहता आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला असून जगभरात दीड लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे १६८ हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर या विषाणूमुळे भारतात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे.