मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर सलग दोन विश्वकरंडक स्पर्धेनंतर 'टी-२०' मधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे. टी-२० विश्वचषक यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आणि पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. 'जर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटविषयी बोलायचे तर आम्हाला सलग दोन विश्वचषक खेळावे लागतील. येत्या काही वर्षांत मी या प्रकारातून निवृत्त होऊ शकतो', असे वॉर्नरने एका वृत्तसंस्थेला सांगितले.
हेही वाचा - तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!
वॉर्नर म्हणाला, 'मला वेळापत्रकावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तिन्ही प्रकारामध्ये खेळणे मला अशक्य होईल. जे खेळाडू तिन्ही प्रकारामध्ये खेळत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा. तुम्ही याबाबतीत डिव्हिलियर्स आणि वीरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूंशी चर्चा करू शकता.'
तो पुढे म्हणाला, 'मला तीन मुले आहेत आणि त्यामुळे नियमित दौरा करणे कठीण होतो. जर मला क्रिकेटचा एक प्रकार सोडण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर मी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटला रामराम ठोकू शकतो.'
ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने आतापर्यंत ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २,०७९ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पंधरा अर्धशतकांचा समावेश आहे.