मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे, हे एकसारखे असल्याचे, ऑस्ट्रेलियाचा सलामीवर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे. वॉर्नरला कोहलीच्या फलंदाजीची भीती वाटते. त्यामुळेच त्याने बहुतेक हे मत व्यक्त केले असणार आहे.
वॉर्नर टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांच्या आगामी मालिकेत खेळण्यास उत्सुक आहे. या हायप्रोफाईल मालिकेत तो भारतीय कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे म्हणाला. त्याच्या मते, कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे, हे एकसारखे आहे.
वॉर्नर म्हणाला, 'रिकाम्या स्टेडियममध्ये भारताच्या आव्हानाला सामोरे जाणे अवास्ताविक असेल. मी संघात स्थान मिळविण्यास प्रयत्नशील आहे. मी मालिकेत खेळण्यास उत्सुक आहे. गेल्या मालिकेत आमची कामगिरी खराब नव्हती, पण चांगल्या संघाने आम्हाला पराभूत केले होते. भारताची गोलंदाजी शानदार आहे. आता भारताची फलंदाजीची बाजूही मजबूत आहे. आमचे गोलंदाज त्यांच्याविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास उत्सुक असून, भारतीय चाहत्यांना या मालिकेची प्रतीक्षा असेल.'
आयपीएल विषयी वॉर्नर म्हणाला, 'जर विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाची शक्यता नसेल तर आम्ही आशावादी व सकारात्मक आहोत की आम्हाला आयपीएलमध्ये खेळता येईल. पण यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आम्हाला आयपीएलमध्ये सहभागी व्हायची परवानगी द्यायला हवी, तरच आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी येऊ.'
दरम्यान, भारताने २०१८-१९ ला ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिका भारताने जिंकली होती. वॉर्नर या मालिकेत चेंडू छेडखानी प्रकरणात निलंबनाची कारवाई झाल्याने खेळू शकला नव्हता.
हेही वाचा - अजिंक्यने आई-बाबांचा फोटो शेअर करत दिल्या 'फादर्स डे'च्या शुभेच्छा
हेही वाचा - होय..! मी दोन वेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिले - स्टिव्ह बकनर