मुंबई - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने भारताविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात मोठा पराक्रम केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून वेगवान ५००० धावांचा टप्पा ओलांडणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने या विक्रमात डीन जोन्सवर कुरघोडी केली.
हेही वाचा - सनरायजर्स हैदराबादने 'या' कंपनीसोबत केला 'टायटल स्पॉन्सरशिप'चा करार
वॉर्नरने ११७ एकदिवसीय सामन्यातील ११५ डावांमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर, जोन्सने १३१ सामन्यांच्या १२८ डावात पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने हा टप्पा ओलांडण्यासाठी १३३ डाव खेळले आहेत. तर, रिकी पाँटिंगने १३७ सामन्यांच्या १३७ डावात पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. वॉर्नरने जसप्रीत बुमराहला चौकार ठोकत हा विक्रम रचला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला आघाडीवर असून त्याने १०४ एकदिवसीय सामन्यांच्या १०१ डावांमध्ये पाच हजार धावा केल्या आहेत. या प्रकरणात विराट कोहली तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने १२० सामन्यांच्या ११४ डावात पाच हजार धावा केल्या आहेत.