नवी दिल्ली - वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने (सीडब्ल्यूआय) कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्पर्धा पुढील ३० दिवसांपर्यत स्थगित केल्या आहेत. आपल्या वैद्यकीय सल्लागार समितीच्या (एमएसी) शिफारशीनुसार विंडीज क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती १६ मार्चपासून सुरू होईल.
हेही वाचा - कोरोनाचा राग चीनवर..! भडकलेला शोएब म्हणाला.. तुम्ही वटवाघुळं, कुत्रे कसं खाऊ शकता?
'आमचे खेळाडू, अधिकारी आणि कर्मचार्यांचे आरोग्य आणि सुरक्षा खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी आम्ही धोरणात्मक पावले उचलण्याचा सल्ला संचालक मंडळाला दिला आहे, असे सीडब्ल्यूआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. इस्त्राईल डोलाट यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असला, तरी मध्य-पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेतही याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. जगभरात कालपर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सुमारे सहा हजार लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ७६ हजार लोक यातून बरेही झाले आहेत.
भारतात आतापर्यंत सुमारे १०० जणांना याची लागण झाली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दहाहून अधिक लोक यातून बरे झाले आहेत. बाकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आयपीएलही पुढे -
बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.