नवी दिल्ली - चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईच्या संघाने यंदा शरणागती पत्करली. आगामी मोसमात चेन्नई कोणाच्या नेतृत्त्वात खेळणार याकडे सर्वांचे सक्ष लागले होते. या बाबात चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी माहिती दिली आहे.
एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधिशी बोलताना काशी विश्वनाथन म्हणाले, ''मला खात्री आहे की २०२१मध्ये धोनी चेन्नईचे नेतृत्व करेल. आयपीएलमध्ये त्याने आमच्यासाठी तीन विजेतेपदे जिंकली आहेत. हे पहिले वर्ष आहे ज्यामध्ये संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. एका हंगामात खराब कामगिरी केली म्हणजे याचा अर्थ असा होत नाही, की आपल्याला संघात सर्वकाही बदलावे लागेल. आमच्या संघाएवढे सातत्य आजपर्यंत इतर कोणत्याही संघाने दाखवलेले नाही. काही सामने आम्ही जिंकायला हवे होते, पण ते सामने आम्ही गमावले. कोरोनाच्या भीतीमुळे दोन वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतल्याने संघाच्या संतुलनावर परिणाम झाला आहे. आम्ही या हंगामात आमच्या क्षमतेनुसार खेळ केला नाही. ''
चेन्नई आणि आयपीएल २०२० -
यंदाचा हंगाम धोनीसेनेसाठी वाईट ठरला. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांपैकी ८ सामने गमावले आहेत, तर केवळ ४ सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे की चेन्नईने साखळी फेरीतील ८ सामने गमावले आहेत. तीन वेळा आयपीएल चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जचा यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. चेन्नईने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आठ गडी राखून पराभव केला. प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडलेला चेन्नई हा पहिला संघ ठरला. राजस्थान रॉयल्सच्या मुंबईवरील विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.