नवी दिल्ली - जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वेळापत्रक जाहीर झाले आहे. या लीगचे आयोजन यावर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे.
एका वृत्तानुसार, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाला (सीएसके) यूएईला जाण्यापूर्वी चेन्नईत एक लहान शिबिराचे आयोजन करायचे आहे. सीएसकेने यूएईला जाण्यापूर्वी त्यांच्या संघातील भारतीय खेळाडूंबरोबर काही दिवस शिबिराचे आयोजन करण्याची योजना आखली आहे, ज्यात खेळाडू आवश्यक प्रशिक्षण सराव करू शकतात. फ्रेंचायझीला हे शिबिर १६ ते २० ऑगस्ट दरम्यान आयोजित करायचे आहे.
या शिबिरामध्ये १५ खेळाडूंना संधी देण्याची फ्रेंचायझीची योजना आहे, त्यासाठी त्यांनी तामिळनाडू सरकारकडे मंजुरीसाठी अर्ज केला आहे. १५ खेळाडूंच्या या संघात कर्णधार महेंद्रसिंह धोनीही असणार आहे. हे शिबिर सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होईल. यानंतर, ते चेन्नईला पोहोचतील. १७ आणि १८ ऑगस्टला पुन्हा या खेळाडूंची चाचणी होईल.
या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स २० ऑगस्टला यूएईला पोहोचतील. यानंतर २१ ऑगस्ट रोजी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स, २२ किंवा २३ ऑगस्टला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि २१ किंवा २२ ऑगस्टला किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ यूएईसाठी रवाना होतील.