नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनुभवी फलंदाज सुरेश रैना आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीमुळे संघ संपूर्ण हंगामात झुंज देत आहे. तर, आता दुखापतीमुळे संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो आयपीएलच्या उर्वरित हंगामाला मुकणार आहे.
चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली. ''मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे ब्राव्हो स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. तो एक-दोन दिवसांत आपल्या घरी परत जाईल'', असे विश्वनाथन यांनी सांगितले.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. मात्र, त्यावेळी ब्राव्हो गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे चेन्नईला सामना गमवावा लागला. शेवटचे षटक ब्राव्होला न दिल्याने कर्णधार धोनीला टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर धोनी आणि प्रशिक्षक फ्लेमिंग या दोघांनीही ब्राव्होच्या दुखापतीविषयी माहिती दिली होती.
आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्याअगोदरही ब्राव्हो दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याला सुरुवातीचे दोन आठवडे खेळता आले नाही. त्यानंतर तो बरा होऊन संघात दाखल झाला होता. मात्र, पुन्हा त्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे. ब्राव्होच्या दुखापतीची चेन्नईच्या संघाला मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे. याची झलक दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही दिसली होती.