मुंबई - भविष्यात खेळाडूंना कोरोनासोबत राहण्याची सवय लावाली लागेल, असे मत भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. कोरोना व्हायरसने क्रिकेट 'कॅलेंडर'वर ब्रेक लावला असून मोठ्या आंतरराष्ट्रीय मालिका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
एका क्रीडा वाहिनीवरील क्रिकेट कार्यक्रमात गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली. भविष्यात चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर निर्बंध येऊ शकतात. या विषयी गंभीर म्हणाला, "मला असे वाटत नाही की अधिक नियम बदलतील. आपल्याकडे लाळेव्यतिरिक्त पर्याय असू शकेल. त्या व्यतिरिक्त मला जास्त काही वाटत नाही."
तो पुढे म्हणाला, "खेळाडू आणि इतर लोकांना या व्हायरससोबत राहावे लागेल. कदाचित या लोकांना याची सवय लावावी लागेल. सोशल डिस्टन्सिंग आणि बाकीचे नियम इतर खेळांमध्ये लागू करणे सोपे होणार नाही. आपण ते क्रिकेटमध्ये लागू करू शकता. परंतु फुटबॉल, हॉकी आणि इतर खेळांमध्ये हे नियम कसे लागू होतील? म्हणून मला वाटते की आपल्याला या व्हायरससोबत राहावे लागेल. जितक्या लवकर आपण याचा विचार कराल तितके चांगले आहे."