नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने वडिलांच्या निधनानंतरच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हार्दिक व त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल सय्यद मुश्ताक अली टॉफीमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व करीत होता. वडिलांच्या निधनानंतर कृणाल बायो बबल सोडल्यानंतर घरी परतला. इंस्टाग्रामवरील भावनिक पोस्टमध्ये हार्दिकने लिहिले, "माझे बाबा, माझे हिरो. तुम्ही आता नाहीत यावर विश्वास ठेवणे ही जीवनातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे. परंतु तुम्ही आमच्यासाठी इतक्या सुंदर आठवणी सोडल्या आहेत, ज्या आम्ही केवळ कल्पना करू शकतो की तुम्ही हसत असाल."
हार्दिक पोस्टमध्ये म्हणाला, "तुमची मेहनत आणि आत्मविश्वासामुळे तुमची मुले या पातळीवर आज उभी आहेत. तुम्ही नेहमी आनंदी होता. आता या घरात तुम्ही नसल्यामुळे मनोरंजन कमी होईल. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि करत राहू. तुमचे नाव नेहमी शीर्षस्थानी राहील. मला एक गोष्ट माहित आहे, की तुम्ही वरुन आमच्याकडे पाहत आहात, जसे तुम्ही इथे असताना करत होता."
"तुम्हाला आमच्यावर अभिमान होता, पण बाबा आम्हा सर्वांना अभिमान आहे की, तुम्ही नेहमी तुमचे आयुष्य जगलात! मी काल म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा म्हणेन की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी तुमची आठवण येईल. लव यू बाबा."
हिमांशु पांड्या यांच्या निधनाबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहली, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा यांनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा - शार्दुल ठाकुरच्या कामगिरीनंतर विराटचे मराठी ट्विट व्हायरल!