मुंबई - क्रिकेटप्रेमींसाठी सध्या एक आनंदाची बातमी आहे. आशियाई ऑलिम्पिक संघटननेने २०२२ साली होणाऱ्या हांगझू आशिया स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त समोर येत आहे.
आशियाई ऑलिम्पिक महासंघाच्या उपाध्यक्षांनी मागील महिन्यात क्रिकेटचा समावेश करण्यासाठी हांगझू येथे जाऊन स्पर्धेच्या ठिकाणांची पाहणी केली होती. रविवारी झालेल्या बैठकीत, ऑस्ट्रेलियासोबतच अन्य देशांना २०२२ साली होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
भारतीय संघाने व्यग्र कार्यक्रमांचे कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतली आहे. आशियाई स्पर्धेतील सहभागाविषयी बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, २०२२ साली होणाऱ्या आशियाई स्पर्धेच्या आयोजनासाठी भरपूर वेळ आहे. वेळ आल्यानंतर यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
आशियाई स्पर्धेत २०१० आणि २०१४ साली क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. परंतु, २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या स्पर्धेत क्रिकेटला वगळण्यात आले होते. परंतु, आता २०२२ साली होणाऱ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१० आणि २०१४ सालाप्रमाणेच टी-ट्वेन्टी प्रकाराचा स्पर्धेत समावेश केला जाणार आहे.