हैदराबाद - कोरोनाव्हायरसच्या साथीचा क्रिकेटविश्वावर खोलवर परिणाम झाला आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे आयसीसीला अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. मागील वर्षी आयसीसीची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा पार पडली. इंग्लंड संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ईटीव्ही भारतने 'क्रिकेट ऑफ द फील्ड्' या कार्यक्रमात इंडिया स्पोर्ट्स प्रेझेंटेर रिधिमा पाठक, अफगाणिस्तान स्पोर्ट्स प्रेझेंटेर दिवा पतंग आणि पाकिस्तानची झैनाब अब्बास यांच्यासह मागील वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
कोरानाकाळातील आयुष्य कसे आहे?
या प्रश्नाचे उत्तर देताना झैनाब अब्बास म्हणाली, की आयुष्य थोडे कठीण झाले आहे. पूर्वी असे व्हायचे की पाकिस्तानचा संघ जिथे जिथे जायचा तिथे मी त्यांच्याबरोबर जायचे. पण आता मला घरीच रहावे लागले आहे. या लॉकडाउनचे फायदे आणि तोटे आहेत. क्रिकेटला सुरुवात झाली हे चांगले झाले. दिवा पतांगनेही कोरोनाकाळ कठीण काळ असल्याचे सांगितले. लंडनमध्ये काम करणे थोडेसे अवघड झाले असल्याचे दिवा म्हणाली.
दिवा पतांग - अफगाणिस्तानात स्पोर्ट्स प्रेझेंटेर म्हणून तुझा प्रवास कसा झाला?
स्पोर्ट्स प्रेझेंटेर म्हणून घेतलेला निर्णय हा एक महिला म्हणून माझ्यासाठी थोडा कठीण होता. जर तुम्ही अफगाणिस्तानचे आहात तर ते अधिक कठीण आहे. कारण क्रिकेटवर पूर्णपणे पुरुषांचे वर्चस्व आहे. सुरुवातीला माझ्या पालकांनी या निर्णयाचे समर्थन केले नाही. परंतू त्यांनी २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी सहमती दर्शवली. कारण ते इंग्लंडमध्ये होते.
झैनाब अब्बास - २०१९ च्या वर्ल्डकपमधील तुझा सर्वोत्कृष्ट सामना कोणता आणि त्या सामन्यातील तुझा सर्वोत्तम क्षण कोणता होता?
माझ्या मते स्पर्धेत बरेच चांगले सामने होते. मी त्यापैकी एक निवडू शकत नाही, परंतु अंतिम सामना जबरदस्त होता. मी जे सामने कव्हर करायची तेच सामने पाहायची. आणि असे सामने पाकिस्तानचेच असायचे. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडमधील सामना मला आवडला. दोन्ही उपांत्य सामने चांगले झाले. मला आवडलेला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचा होता. कारण न्यूझीलंडचा संघ खूप मजबूत होता. तो सातत्याने चांगली कामगिरी करत होता. त्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले. प्रेक्षकांचा उत्साह विलक्षण असल्याने मला हा सामनाही आवडला.
रिधिमा - तुझ्यासाठी वर्ल्डकपचा अनुभव कसा होता आणि या स्पर्धेतील अविस्मरणीय गोष्ट कोणती?
मला आवडलेला सामना भारत आणि अफगाणिस्तानमधील सामना होता. कारण त्यादिवशी अफगाणिस्तानचा संघ चांगला खेळला. सामना सुरू होण्यापूर्वी मला चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. जर पाहिले तर दोन्ही संघांच्या प्रेक्षकांमध्ये प्रतिस्पर्धा असते, पण त्यादिवशी भारत आणि अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांमध्ये कोणतीही स्पर्धा नव्हती. ते एकमेकांना प्रोत्साहन देत होते. ते खूप नेत्रदीपक होते. हा सामना खूप रोमांचक होता . मोहम्मद शमीने त्या सामन्यात हॅटट्रिक घेतली तेव्हा मी खूप उत्सुक होते.