सिडनी - यावर्षी होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा धोकादायक असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन रॉबर्ट्स यांनी कबूल केले आहे. रॉबर्ट्स यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉलद्वारे पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''अर्थात, आम्ही सर्वजण नियोजित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होण्याची अपेक्षा करत आहोत, परंतु हे खूप धोकादायक आहे.''
रॉबर्ट्स म्हणाले, “हा कार्यक्रम झाला नाही तर पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विंडो होण्याची शक्यता आहे.” यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. परंतु कोरोनाव्हायरसमुळे या स्पर्धेचे वातावरण ढगाळले आहे.
रॉबर्ट्स यांनी मात्र, याबाबत अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घ्यावा, असे स्पष्ट केले. आयसीसीची या विषयाबाबत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीचे सर्व विषय पुढील बैठकीपर्यंत 10 जूनला तहकूब करण्यात आले आहेत.