मुंबई - केंद्र सरकारने देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला आहे. पण यात ठप्प पडलेले व्यवहार सुरळीत करण्यासाठी काही गोष्टींना सशर्थ परवानगी देण्यात आली आहे. यात केंद्राने Sports Complex आणि मैदानं सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. याशिवाय राज्य सरकारनेही कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागांमध्ये खेळाडूंना सरावाची परवानगी दिली आहे. यामुळे खेळाडू लवकरच सराव करताना पाहायला मिळतील. पण मुंबई रेड झोनमध्ये असल्याने मुंबईतील खेळाडूंना मात्र मैदानावर सराव करता येणार नाही.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'केंद्राने मैदानं खुली करण्यासाठी परवानगी दिली आहे. यात त्यांनी प्रेक्षकांना प्रवेश देऊ नये, अशी अट घातली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या सर्व नियमांचं पालन आम्ही करणार आहोत. वानखेडे मैदान, बीकेसी आणि कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखाना या ३ भागात एमसीएची सरावकेंद्र आहेत. हा सर्व भाग रेड झोनमध्ये येतो. यामुळे ही सर्व केंद्र बंद राहणार आहेत.'
मुंबईतील सराव केंद्र रेड झोनमध्ये येत असल्याने, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंना पुढचे काही दिवस सराव करण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. जरी केंद्र सरकारने मैदानं सुरू करण्याची परवानगी दिली असली तरीही प्रवासासाठी बंदी कायम आहे. यामुळे आयपीएलबाबत बीसीसीआयला कोणताही निर्णय घेता येणे शक्य नाही.
हेही वाचा - करिअरच्या सुरूवातीला 'या' गोलंदाजाला खेळणं कठीण ठरलं - विराट
हेही वाचा - पत्नीसाठी काय पण..! विराट अनुष्कासाठी बनला डायनॉसोर, पाहा मजेशीर व्हिडिओ