लंडन - कोरोना व्हायरसचा परिणाम आता क्रिकेटवर दिसू लागला आहे. कोरोनाच्या भीतीने क्रिकेटपटू दुसऱ्या संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. हा पावित्रा इंग्लंड संघाने घेतला असून इंग्लंडचा संघ या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
या विषयी इंग्लंडचा कर्णधार जो रुटने सांगितले, की 'दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इंग्लंडच्या खेळाडूंना गॅस्ट्रो आणि तापाच्या आजाराचा सामना करावा लागला होता. या अनुभवानंतर आम्ही अन्य खेळाडूंशी कमीत कमी संपर्क होईल याची दक्षता घेणार आहोत. वैद्यकीय सल्लागारांनी व्हायरस आणि बॅक्टेरीया यांच्यापासून वाचण्यासाठी आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार श्रीलंका दौऱ्यावर आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाही. मैदानावर उतरताना आम्ही अँटी बॅक्टेरीया वाईप्स वापरणार आहोत.'
आमच्या मनात प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दल आदर आहे, परंतु कोरोना व्हायरसबाबत खबरदारी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. हाताची मुठ एकमेकांच्या हातावर मारून आम्ही आदर व्यक्त करु, असेही रुटने सांगितले. दरम्यान ७ मार्चपासून इंग्लंडचा श्रीलंका दौरा सुरू होणार आहे आणि दोन सराव सामन्यांनंतर १९ मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
कोरोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत २ हजार ८३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगातील अन्य देशात मिळून ८४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जगभरात अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया या सारख्या ४५ देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हे संपूर्ण जगावर आलेले मोठे संकट असल्याचे सांगत जगभरात आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
हेही वाचा - VIDEO : खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटबद्दल पाकिस्तानच्या इंझमामने दिले मत