मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) आणखी एक राजीनामा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे जनरल मॅनेजर (क्रिकेट ऑपरेशन्स) सबा करीम यांनी राजीनामा दिला आहे. लवकरच याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. तत्कालीन सीईओ राहुल जोहरी यांच्यासमवेत करीम डिसेंबर 2017 मध्ये बोर्डात आले होते.
नुकताच मंडळाने जोहरी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जोहरी यांनी 27 डिसेंबरला राजीनामा दिला होता. जोहरी 2016 मध्ये बोर्डात सामील झाले. सौरभ गांगुली मंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
जगातील इतर क्रीडा संस्थांप्रमाणेच बीसीसीआयलाही कोरोना व्हायरसमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल म्हणून काम करणारे माजी यष्टीरक्षक सबा करीम यांचे स्थान धोक्यात आले होते. करीम यांचे कामात फारसे योगदान नसल्याचे बोर्डाचे मत होते.
52 वर्षीय सबा करीम निवडकर्ताही होते. त्यांनी देशासाठी एक कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी 120 सामने खेळले असून त्यात 22 शतके आणि 33 अर्धशतकांच्या मदतीने 7310 धावा केल्या आहेत.