ठाणे - क्रिकेटच्या खेळावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्रावर चाकूने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीच्या गैबीनगर येथे घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद मेहरान मोहम्मद युसूफ शेख ( २४ रा. याकूब मेंशन अपार्टमेंट, गैबीनगर ) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर आरिफ शेख आणि समीर बखरवाला असे हल्लेखोर मित्रांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद मेहरान हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. खेळादरम्यान, त्याचा आरिफ शेख, समीर बखरवाला या मित्रांसोबत वाद झाला. याचा राग आरिफ आणि समीर यांच्या मनात होता. तेव्हा त्या दोघांनी या रागातून मोहम्मद मेहरान याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
मोहम्मद मेहरान हा त्याच्या घरासमोर मोबाईल फोनवर बोलत असताना दोघांनी शिवीगाळ करून त्याला मारहाण करायला सुरूवात केली. तर आरिफने सोबत आणलेल्या धारदार चाकूने मेहरान याच्यावर सपासप वार केले. यात मेहरान गंभीर जखमी झाला. तेव्हा दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
मेहरान यांच्यावर स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरिफ व समीर यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार आर. आर. चौधरी करत आहेत.
हेही वाचा - वाशिममध्ये अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य
हेही वाचा - बायको सोडून गेली, प्रेयसीचेही लग्न झाल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या