मुंबई - आयपीएलच्या नव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. अंतिम सामना मुंबईत २४ मेला खेळवण्यात येईल. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत अजून दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
हेही वाचा - भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार काळाच्या पडद्याआड
लीगमध्ये प्रथमच कन्कशन सबस्टिट्युट (Concussion Substitute) आणि थर्ड अंपायर नोबलचा नियम आणला जात आहे. कन्कशन सबस्टिट्युट म्हणजे कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.
तर, नो बॉलच्या नियमामध्ये आता स्पर्धेत प्रथमच मैदानावरील पंचांच्या जागी हा निर्णय तिसरा पंच घेईल. भारत आणि वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेत त्याची चाचणी झाली होती. 'आयपीएलपूर्वी बीसीसीआय चॅरिटी ऑल स्टार्स सामना खेळेल. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असणार आहेत. मात्र, अद्याप सामन्याचा निर्णय झालेला नाही. हा सामना अहमदाबाद येथे होणार नाही, कारण तेथे स्टेडियमचे काम अजूनही सुरू आहे', असे गांगुलीने म्हटले आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, हा प्रस्ताव बैठकीत फेटाळण्यात आला आहे. यामुळे सर्व सामने ८ वाजता सुरुवात होतील.