ढाका - बांगलादेश प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यात कोमिला व्हिक्टोरियन्ससमोर ढाका डायनामाईट्सचे आव्हान होते. ६१ चेंडूत तब्बल १४१ धावांची धडाकेबाज खेळी करताना तमिम इक्बालने कोमिला व्हिक्टोरियन्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तमिमला १४१ धावांच्या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर, शाकिब अल हसनला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामन्यात ढाका डायनामाईट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोमिलाकडून फलंदाजीसाठी आलेल्या तमिमने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ढाकाचा गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तमिमने त्याच्या १४१ धावांच्या खेळीत १० चौकार आणि ११ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर कोमिलाने १९९ धावा केल्या. कोमिलाच्या इतर फलंदाजांना सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही.
कोमिलाच्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ढाकाने आक्रमक सुरुवात करताना ९ षटकांत १०० धावा केल्या होत्या. परंतु, उपुल थरंगा ४८ धावा आणि रोनी तालुकदार ६६ धावा बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. कायरन पोलार्ड आणि आंद्रे रसेलला वाहब रियाझ आणि थिसारा परेराच्या गोलंदाजीवर धावा काढत्या आल्या नाहीत. रियाझ आणि परेराने चांगली गोंलदाजी करताना संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.