मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती सीओए आयपीएल सामन्यांच्या बाबतीत निर्णय दिला आहे. सीओएने स्पष्ट केले, की २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत सायंकाळचे सामने ४ वाजता तर रात्रीचे सामने ८ वाजता सुरू होतील.
आयपीएलमध्ये रात्री ८ वाजता सुरू होणाऱ्या सामन्यांची वेळ बदलून ७ वाजता करावी, यासाठी बीसीसीआयवर दबाव होता. गेल्याकाही वर्षातही अशी मागणी करण्यात येत होती. ही मागणी मुख्यत: प्रसारणकर्ते आणि काही संघमालकांमुळे करण्यात येत होती. गुरुवारी बीसीसीआय आणि सीओएच्या यांच्यात सामन्यांच्या वेळेबाबत बैठक घेण्यात आली. सीओएने यावर अंतिम निर्णय देताना स्पष्ट केले, की यावर्षीही सामने रात्री ८ वाजता सुरू होतील.
आयपीएलचे पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहिर झाल्यानंतर घोषित केले जाणार आहे. गेल्यावर्षी साखळी फेरीतील सामने ८ वाजता तर, प्लेऑफचे सामने ७ वाजता सुरू करण्यात आले होते.