नवी दिल्ली - वेस्ट इंडीजचा संघ डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि विडींज संघात ३ सामन्यांची टी-२० आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. भारतीय संघाची या दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अद्याप विडींज संघ घोषित करण्यात आलेला नाही. भारत दौऱ्याविषयी स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला विडींज बोर्डाने विचारणा केली असता त्याने आपण विश्रांती घेणार असल्याचे सांगितले.
भारताविरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी ख्रिस गेलचा संघात समावेश होणार की, नाही याबद्दल शंका होती. मात्र, वेस्ट इंडीज बोर्डाने गेलला भारता विरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी विचारणा केली. तेव्हा गेलने आपण या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे, गेलने काही तासांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) मधून माघार घेतली आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धाही खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल विश्रांती घेऊन २०२० सालची रणनीती आखणार आहे.
काही तासांपूर्वीच गेलने पत्रकार परिषद घेऊन, मी जेव्हा चांगला खेळ करतो. तेव्हा सन्मान मिळतो. पण ज्यावेळी मी अपयशी ठरतो. तेव्हा मात्र मी सर्वात खराब खेळाडू ठरतो. मी हे केवळ एका संघाबाबत सांगत नाही. मी विविध टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेत अनेक वर्षे खेळलो आहे, त्यात मी जे अनुभवले ते सांगत असल्याचे म्हणाला होता.
हेही वाचा - मी संघासाठी 'ओझं', कोणीही माझा मान राखत नाही; ख्रिस गेलची टी-२० स्पर्धेतून माघार
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीला आम्हाला द्या, 'या' क्रिकेट बोर्डाने केली बीसीसीआयकडे मागणी