जमैका - वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने वैयक्तिक कारणामुळे कॅरेबियन प्रीमियर लीगमधून माघार घेतली आहे. खेळाडूंचा ड्रॉफ्ट होण्याच्या एक दिवस आधी गेलने हा निर्णय घेतला. सरकारच्या मान्यतेनंतर ही लीग 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे खेळली जाणार आहे.
गेलने आपल्या ईमेलमध्ये लिहिले आहे, की लॉकडाऊनमुळे तो जमैका येथे अडकला होता आणि सेंट किट्समध्ये असलेल्या आपल्या कुटुंबाशी आणि मुलांशी भेटू शकला नाही. त्यामुळे सध्या आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी विश्रांतीची गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.
गेलचा सेंट लुसिया जाउक्स बरोबर करार होता. नुकताच तो या संघाशी जोडला गेला होता. याआधी तो जमैका तलावास संघाचा सदस्य होता. हा संघ सोडताना गेलने आपला जुना साथीदार क्रिकेटपटू सारवानवर गंभीर आरोप केले होते. मात्र, गेलने यासंदर्भात माफी मागितली होती.
ख्रिस गेल आतापर्यंत कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये तीन संघाकडून खेळला आहे. गेलने आपले पहिले चार सीपीएल हंगाम तलावाससोबत खेळले आणि त्यानंतर पुढील दोन हंगाम सेंट किट्स आणि नेव्हिस प्रॅट्रियट्स यांच्यासाठी खेळले. वेस्ट इंडिजकडून गेलने 103 कसोटी आणि 301 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मागील वर्षी ख्रिस गेलने दोनदा निवृत्तीची घोषणा केली आणि आपला निर्णय मागे घेतला.