शारजाह - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलच्या तेरावा हंगाम वाईट स्वप्नासारखाच ठरला. शुक्रवारी झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला २० षटकांत ११४ धावाच करता आल्या. एकवेळ चेन्नईची अवस्था ३ धावांवर ४ गडी बाद अशी झाली होती आणि चेन्नई संघ पॉवर प्लेमध्ये फक्त २४ धावाच करू शकला. चेन्नईचे आव्हान मुंबईच्या इशान किशनचे नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने १२.२ षटकांत पूर्ण करत हा सामना १० गड्यांनी खिशात घातला. चेन्नईच्या या पराभवानंतर धोनी नाराज झाला असून त्याने आपली नाराजी सामना संपल्यानंतर बोलून दाखवली.
सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला, आमच्याकडून चूका झाल्या, हा हंगाम आमचा राहिला नाही. आम्ही फक्त एक किंवा दोन सामन्यात चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकलो. सर्व खेळाडू दु:खी आहेत. ते आपले सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा काटेकोर प्रयत्न करत आहे. पण सर्व बाबी आमच्या विरोधात जात आहेत. पुढील वर्षी आम्हाला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे, असे तो म्हणाला. कर्णधार आहे. मी संकटात पळू शकत नाही. यामुळे राहिलेल्या सर्व सामन्यात देखील मी खेळणार आहे, असे धोनीने स्पष्ट केले.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला आपल्या तालावर चांगलेच नाचवले. मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी यावेळी लोटांगण घातले. वरचे फलंदाज फेल ठरल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी लाज राखल्यामुळे चेन्नईला मुंबईपुढे ११५ धावांचे आव्हान ठेवता आले. चेन्नईच्या सॅम करनने यावेळी अर्धशतक झळकावले. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला शतकाच्यापुढे धावसंख्या उभारता आली. मुंबईने हा सामना १० गडी राखून जिंकला. यात मुंबईच्या इशान किशनने नाबाद ६८ धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने नाबाद ४६ धावांची खेळी साकारली.