नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या कसोटीत चांगले प्रदर्शन करत आहे. मागील वर्षी कसोटीत पदार्पण केलेल्या बुमराहने कसोटी क्रिकेटबद्दल आपले मत मांडले आहे. तो म्हणाला, 'कसोटीत मला नेहमीच चांगले प्रदर्शन करायचे होते.'
हेही वाचा - अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाकडून 'एपीएल'चा दुसरा हंगाम रद्द
बुमराह म्हणाला, 'मर्यादित षटाकांमध्ये मला बांधून घ्यायचे नव्हते. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट अत्यंत महत्वाचे आहे. मला या प्रकारात नेहमीच चांगले प्रदर्शन करायचे होते. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटपुरते मर्यादित न राहता कसोटीत मला माझी ओळख बनवायची होती. त्यामुळे कसोटीला मी प्रथम प्राधान्य दिले आहे.'
बुमराह पुढे म्हणाला, 'मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगले करु शकतो असा मला नेहमीच विश्वास होता. आणि तोच विश्वास मी कसोटीतही दाखवला. मी फक्त १२ कसोटी सामने खेळलो आहे. मी जेव्हा आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळलो तेव्हा माझे स्वप्न सत्यात उतरले होते.'
'पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा एक वेगळाच अनुभव असतो. आणि संघाच्या विजयात मदत करता येते हे माझ्यासाठी समाधानकारक आहे', असेही बुमराह म्हणाला. यॉर्करकिंग बुमराहने विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात हॅटट्र्किसह १३ बळी घेतले आहेत.
कागिसो रबाडाने जसप्रीत बुमराहची केली स्तुती :
भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये तीनही प्रकारातील मालिकेत यजमान विडींजला 'व्हाइटवॉश' दिला. या दौऱ्यातील कसोटी मालिका गाजवली ती भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने. बुमराहने २ सामन्यांच्या मालिकेत तब्बल १३ गडी बाद केले. जसप्रीतच्या भन्नाट कामगिरीवर दक्षिण आफ्रिकी गोलंदाज 'फिदा' झाला असून त्याने बुमराहची स्तुती केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा याने जसप्रीत बुमराहची एका मुलाखतीत स्तुती केली आहे. रबाडा बुमराहविषयी बोलताना म्हणाला की, 'जोफ्रा आर्चरला मिळालेली प्रतिभावान गोलंदाजी ही दैवी देणगी आहे. मात्र, बुमराह हाही उत्तम गोलंदाज आहे. बुमराह गोलंदाजीत काहीही करू शकतो. तो मैदानावर जादू घडवू शकतो, अशा गोलंदाजांचे मला नेहमीच कौतुक वाटते.'