मुंबई - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्माने शतकाच्या धडाका लावला आहे. त्याने स्पर्धेतील ८ साखळी सामन्यामध्ये ५ शतके ठोकली आहेत. रोहित शर्मा हा बहुताशं लोकांना फलंदाज म्हणून परिचित आहे. मात्र तो सर्व प्रथम एक गोलंदाज म्हणूनच क्रिकेटची सुरुवात केली होती. अशी माहिती रोहितचे प्रशिक्षण चेतन लाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
चेतन लाड हे शाळाअंतर्गत सुरू असणाऱ्या स्पर्धांसाठी गोलंदाजाचा शोध घेत होते. तेव्हा रोहित शर्माची भेट लाड यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी १२ वर्षीय रोहितला गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यावेळेला रोहितने २ षटके ऑफस्पिन गोलंदाजी केली. त्यांची गोलंदाजी पाहून लाड यांनी त्याला कुठे राहतोस अशी विचारणा केली. तेव्हा त्याने मी काकाकडे राहत असल्याचे सांगितले. यावर लाड यांनी रोहितच्या काकांची भेट घेऊन तो चांगला गोलंदाज असल्याचे सांगितले.
तसेच त्यांनी रोहितच्या काकांना स्वामी विवेकानंद शाळेकडून खेळण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्याच्या काकांनी शाळेची फी विषयी विचारना केली. त्यावेळेला असलेली २७५ रुपये इतकी फी आम्ही भरु शकत नसल्याचे रोहितच्या काकांनी सांगितले. तेव्हा प्रशिक्षक लाड यांनी शाळा प्रशासनाला विनंती करुन रोहितची फी माफ करण्यासाठी विनंती केली. शाळा प्रशासनाने लाड यांच्या विनंती मान देऊन रोहितची फी माफ केली.
त्यानंतर लाड यांनी रोहितला १४ वर्षाखालील संघामध्ये खेळवले. त्यात त्याने चांगली गोलंदाजी करत आपली छाप सोडली. हे पाहून लाड यांनी रोहितला १६ वर्षीखालील संघात खेळण्याची संधी दिली. त्यातही त्याने चांगली गोलंदाजी केली.
रोहित फलंदाज म्हणून असा आला उदयास -
एक दिवस रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. तेव्हा चेतन लाड अजून सरावाच्या ठिकाणी आलेले नव्हते. ते आले तेव्हा रोहित आपल्या फलंदाजीचे कौशल्यपणाला लावत होता. लाड यांनी रोहितची फलंदाजी पाठमोऱ्या अवस्थेत पाहिली. त्यांना नेमका कोण फलंदाजी करत आहे. हे लक्षात आले नाही. त्यांना वाटले की, कोणीतरी नविन फलंदाज फलंदाजी करत आहे. जेव्हा त्यांनी रोहितला पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.
त्यांनी रोहितला विचारले की तु फलंदाजी करु शकतोस, तो म्हणाला 'हो' अशा पध्दतीने महान फलंदाज रोहित शर्माचा फलंदाज म्हणून उदयास आला.