नवी दिल्ली - 2019 च्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेवर इंग्लंडच्या संघाने नाव कोरले. आज त्यांच्या विजयाला एक वर्ष पूर्ण झाले. इंग्लंडच्या या विजयाशी संबंधित नव्या पुस्तकात फलंदाज बेन स्टोक्सविषयी एक किस्सा समोर आला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या सुपरओव्हरपूर्वी स्वत:ला तणावमुक्त करण्यासाठी स्टोक्सने 'सिगरेट ब्रेक' घेतला होता.
या ऐतिहासिक कामगिरीच्या एका वर्षानंतर, 'मॉर्गन मेन : द इनसाइड स्टोरी ऑफ इंग्लंड राइज ऑफ क्रिकेट वर्ल्ड कप ह्यूमिलीऐशन टु ग्लोरी' या पुस्तकात त्या दिवशी स्टोक्सवर कसा दबाव होता, हे उघड झाले. निक हॉल्ट आणि स्टीव्ह जेम्स यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यानुसार, 27,000 हजार प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये सुपर ओव्हरपूर्वी आणि प्रत्येक बाजूला लागलेल्या कॅमेरामुळे एकांत शोधणे कठीण होते.
''बेन स्टोक्स लॉर्ड्सवर बर्याच वेळा खेळला आहे आणि त्याला लॉर्ड्सची चांगली ओळख होती. जेव्हा इऑन मॉर्गन इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्नात होता, तेव्हा स्टोक्सने स्वत:साठी वेळ घेतला. स्टोक्स धूळ आणि घामांनी भिजला होता. त्याने तणावातून दोन तास 27 मिनिटे फलंदाजी केली. त्यानंतर स्टोक्स अंघोळ करायला गेला. तिथे त्याने सिगरेट पेटवली आणि काही मिनिटे शांततेत घालवली'', असे पुस्तकात म्हटले गेले आहे.
अतिशय थरारक आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडचा पराभव केला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वकरंडकावर नाव कोरले. 14 जुलै 2019 रोजी ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेलेला हा सामना सुपरओव्हरपर्यंत गेला होता. सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघांनी समान धावा केल्या. त्यानंतर सर्वाधिक चौकार-षटकारांच्या नियमांवर इंग्लंडला विजेता ठरवण्यात आले.