मँचेस्टर - इंग्लंडचा उपकर्णधार बेन स्टोक्सने वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकत आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. इतकेच नव्हे तर, कसोटीच्या फलंदाजांच्या यादीतही तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. स्टोक्सची ही कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारी आहे.
मॅंचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यादरम्यान जेसन होल्डरनंतर स्टोक्स 54 गुणांनी मागे होता. मात्र, त्याने पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 78 धावा केल्या. त्यामुळे स्टोक्सने 38 गुणांची आघाडी घेतली आहे. सामन्यात स्टोक्सने तीन गडीही बाद केले.
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी स्टोक्सने महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडने हा सामना 113 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
आयसीसीच्या क्रमवारीत होल्डर मागील 18 महिन्यांपासून अष्टपैलू खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांकावर होता. 2006 मध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. स्टोक्सचे आता 497 रेटिंग गुण आहेत. एप्रिल 2008 पासून आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने मिळवलेले हे सर्वोच्च रेटिंग गुण आहे. त्याच्या अगोदर जॅक कॅलिसचे 517 रेटिंग गुण होते.
स्टोक्स आता फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनसोबत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या आधी प्रथम क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ तर, दुसऱ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट नवव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत स्टुअर्ट ब्रॉडने दुसर्या सामन्यात तीन गडी बाद केल्यामुळे पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे. तर, वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन 11 व्या स्थानावर घसरला आहे.