अबुधाबी - राजस्थानचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएलमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना दोन शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रविवारी शेख झायेद स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स असा सामना पार पडला. यात स्टोक्सने अवघ्या ६० चेंडूत नाबाद १०७ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले.
मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर स्टोक्सला सामनावीर पुरस्कारही मिळाला. सामन्यानंतर तो म्हणाला, "खरे सांगायचे तर संघासाठी अशी खेळी करण्यात मला वेळ लागला. दोन-तीन सामने आधी मला हा फॉर्म हवा होता. फॉर्ममध्ये परत येणे नेहमीच चांगले आहे. हा एक चांगला विजय आहे." राजस्थानचा पुढील सामना शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रविवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.
स्टोक्स आणि आयपीएल -
स्टोक्सने यापूर्वी, २०१७मध्ये, पुणे रायझिंग सुपरजायंट्सकडून खेळताना १०३ धावा केल्या होत्या. त्या हंगामात स्टोक्सला पुणेने १४.५ कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल केले होते. या मोसमात त्याने १२ सामन्यांत १२ बळी घेतले आणि ३१२ धावाही केल्या.