कोलकाता - भारताचा महान माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची काल गुरुवारी (२८ जानेवारी) दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गांगुलीच्या हृद्यात दोन स्टेंट बसवण्यात आले. छातीत दुखत असल्यामुळे गांगुलीला बुधवारी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर याच महिन्याच्या सुरुवातीला पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
वूडलँड रुग्णालयात पहिली अँजिओप्लास्टी -
याआधी २ जानेवारीला गांगुलीला जिममध्ये व्यायाम करत असतानाच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तत्काळ कोलकातामधील वूडलँड या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर ७ जानेवारीला गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुलीने रुग्णालयाच्या सदस्यांचे आभार मानले होते.
यशस्वी भारतीय कर्णधार -
गांगुली २००० ते २००४ या काळात भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. कसोटी पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने १३१ धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा १०वा फलंदाज ठरला.
१९९२ मध्ये पदार्पण -
गांगुलीने १९९२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे तो संघाबाहेर राहिला. गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.
हेही वाचा - VIDEO : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली चेन्नईत दाखल