कोलकाता - कोरोना विषाणूची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. यामुळे दैनंदिन रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला. यात आता सौरव गांगुलीच्या नावाचीही भर पडली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीसाठी सरसावला आहे. त्याने नुकतंच क्वारंटाइनसाठी इडन गार्डन स्टेडियम खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला. याहीपुढे जात गांगुलीने कोलकातातील गरजूंना ५० लाख किमतीचे तांदूळ पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. गांगुली आणि लाल बाबा राईस यांनी पुढाकार घेत गरजूंना मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूपासून सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या गरजूंना हे धान्य देण्यात येणार आहे. गांगुलीच्या या पुढाकाराने अनेकजण पुढे येतील आणि मदत करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याआधी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने २५ लाख तर असोसिएशनचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी ५ लाखांचा निधी जाहीर केला आहे.
चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे २० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाचे ५०० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १० वर पोहोचला आहे.
हेही वाचा - Corona Virus : आयओसीच्या ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत, पण...
हेही वाचा - Video : शिखर धवनची 'ती' अवस्था पाहून, सायना नेहवालसह क्रिकेटपटूंकडून सांत्वन