नवी दिल्ली - यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणे, सध्या तरी शक्य दिसत नाही, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी दिले होते. त्यांच्या वक्तव्याचा परिणाम वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही दिसू शकतो.
जर विश्वकरंडक स्पर्धा झाली नाही, तर आयपीएल होण्याची शंका बळावली आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका पुन्हा शेड्यूल करणे ही समस्या ठरणार नाही, अशी आशा बीसीसीआयने व्यक्त केली.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी एका वृत्तसंस्थेला सांगितले, ''टी-20 वर्ल्डकप रद्द झाल्यास बोर्ड त्या विंडोचा वापर निश्चितपणे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आयोजनासाठी करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या आधी किंवा एकदिवसीय मालिकेनंतरही ही टी-20 मालिका खेळवण्यात येऊ शकेल. वर्ल्डकप रद्द झाल्यास ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा करणे व्यावहारिक ठरणार नाही आणि आयपीएल त्या काळात आयोजित केली गेली तर आपण आयपीएलनंतरही हा दौरा करू शकतो.''
ते पुढे म्हणाले, "जर आयपीएल झाले नाही तर त्याचा फ्यूचर टूर प्रोग्रामवर (एफटीपी) परिणाम होईल. जिथपर्यंत भारताचा प्रश्न आहे, बीसीसीआयला महसूल निश्चित करावा लागेल जेणेकरून यावर्षी घरगुती खेळाडू पैसे कमवू शकतील. हे फक्त भारताशी संबंधित आहे."
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे भवितव्य अद्यापही अंधारातच आहे. 10 जूनला आयसीसीच्या बैठकीत टी-20 विश्वकरंडक आयोजनाबद्दल चर्चा झाली, पण यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला आहे.