मुंबई - इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान १६ जूनला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मात्र हा सामना होणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. या सामन्यासंदर्भात सरकारच निर्णय घेईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे. यातच बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहून विश्वकंरडक स्पर्धेतून पाकिस्तानला बाहेर करण्याची मागणी करणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
एका वाहिनीच्या पत्रकाराने ट्वीट केले आहे, की बीसीसीआय पाकिस्तानला विश्वकरंडकातून बाहेर करण्यासाठी तयारी करत आहे. याबाबत उद्या बैठक होणार आहे.
पुलवामा हल्ला १४ फेब्रुवारीला झाला. यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱया विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यावर चर्चा होत आहेत. याबाबत आयसीसी २७ फेब्रुवारीला यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. मॅनचेस्टर येथे १६ जूनला भारत-पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडकाचा सामना होणार आहे.