मुंबई - कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने सर्व महत्वाच्या स्पर्धेसह आयपीएलचा १३ हंगामही स्थगित केला आहे. जर आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठे नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय या वर्षाच्या अखेरीस आयपीएलचे आयोजन करता येईल का? याची चाचपणी करीत आहे. या संदर्भातील वृत्त आयएएनएसने दिले आहे.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार करीत आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, 'आयपीएलच्या आयोजनाबाबत ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. कारण यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. पण बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन करता येईल का, याची चाचपणी करत आहे. यासाठी परिस्थितीमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. याशिवाय सरकारची परवानगी गरजेची आहे, असे सूत्रांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर, सरकारने स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी दिली तर आयोजनाबाबतची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे. यामुळे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. देशातील परिस्थिती सुधारणे आणि सरकारची परवानगी मिळणे, यावर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.
हेही वाचा - करिअरच्या सुरूवातीला 'या' गोलंदाजाला खेळणं कठीण ठरलं - विराट
हेही वाचा - पत्नीसाठी काय पण..! विराट अनुष्कासाठी बनला डायनॉसोर, पाहा मजेशीर व्हिडिओ