मुंबई - टीम इंडियाच्या प्रशिक्षक आणि इतर जागांसाठी काही दिवसांत मुलाखती घेण्यात येणार आहेत. मात्र, त्याअगोदर बीसीआयला 'कोचिंग स्टाफ'च्या जागेसाठी तब्बल २००० अर्ज आले आहेत.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी अर्ज केला आहे. मूडी यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा खूप अनुभव आहे. न्यूझीलंडचे माजी आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनीही अर्ज केला आहे. भारतीयांमध्ये रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत यांनीही आपली दावेदारी सांगितली आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफसाठी अर्ज मागवले होते. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱयांना अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना मुलाखतीमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. विश्वकरंडक स्पर्धा ओटोपल्यानंतर, कोचिंग स्टाफचा कार्यकाल संपुष्टात आला होता. मात्र, ४५ दिवसांसाठी तो वाढवण्यात आला होता.
सध्याचा काळात टीम इंडियात बदल झाल्यास, पुढील पाच वर्षांच्या रणनीती आणि योजनेत देखील बदल होईल, कारण भविष्याचा विचार करता 2020 च्या टी -20 विश्वकरंडक स्पर्धेत तरुण खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते.