मुंबई - बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली आहे. यात १० संघांसह आयपीएल खेळवण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. पण हे दहा संघ २०२१ च्या हंगामात नव्हे, तर २०२२ च्या आयपीएलमध्ये असणार आहेत.
बैठकीत काय ठरलं?
आज (गुरुवार) अहमदाबाद येथे बीसीसीआयची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात अनेक निर्णय घेण्यात आले. आयपीएलमध्ये १० संघ खेळवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देखील यात देण्यात आली. पण २०२१ च्या हंगामात ८ संघ असणार आहेत. यानंतर २०२२ च्या हंगामात १० संघासह आयपीएल होणार आहे.
आयपीएलच्या चौदावा हंगाम म्हणजे आयपीएल २०२१ च्या हंगामाला काही महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात जर १० संघाचा समावेश केला तर सामने अधिक होणार. यामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिघडण्याची भिती होती. त्यासोबत परदेशी खेळाडूंची उपलब्धता हा देखील मुद्दा होता. याशिवाय लिलावासह अनेक बाबींचा विचार करून बीसीसीआयने हा हंगाम ८ संघामध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२२ च्या हंगामात दहा संघ खेळवण्यास बीसीसीआयने मान्यता दिली. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. २०२२ च्या हंगामात नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
प्रथम श्रेणीच्या खेळाडूंना मिळणार मोबदला
कोरोना महामारीमुळे प्रथम श्रेणी सामन्याचे वेळापत्रक कोळमडले. यात सामने रद्द करण्यात आले. परिणामी याचा फटका खेळाडूंच्या मानधनावर झाला. बीसीसीआयने या खेळाडूंचा विचार करत त्यांना योग्य मोबदला देण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे महिला आणि पुरुष खेळाडूंना लाभ मिळणार आहे.
हेही वाचा - भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम; गावसकर यांचा गंभीर आरोप
हेही वाचा - IND Vs AUS : सिडनी कसोटीवर कोरोनाचे सावट; ऑस्ट्रेलिया बोर्डाने घेतला 'हा' निर्णय