नवी दिल्ली - कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली होती. बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही. मात्र, या स्पर्धा होण्याची अद्यापही बीसीसीआयला आशा आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय विदेशी क्रिकेट मंडळांसोबत चर्चेत असल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए), इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए)सारख्या इतर सर्व विदेशी क्रिकेट मंडळांनाही सद्यस्थिती आणि सरकारच्या निर्देशांबद्दल सतत माहिती देण्यात आली आहे.
या सर्व खटाटोपामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल फ्रँचायझी अजूनही या स्पर्धेबाबत आशावादी आहेत. क्लोज-डोर-टुर्नामेंटसारख्या विविध पर्यायांवर चर्चा झाली आहे. परंतु, आता हे स्पष्ट झाले आहे, की परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी व्हावेत, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. शिवाय परदेशी खेळाडू हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआय आयपीएल आता ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या विंडोमध्ये घेण्याची विचार करत आहे. मात्र, आयसीसीने यंदाची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली तर आयपीएल शक्य होईल, अशी चर्चा समोर आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या फ्रँचायझींची पुढची बैठक १४एप्रिलनंतरच पार पडेल.