नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फ्रेंचायझींना स्पष्ट केले आहे, की कोणताही संघ 20 ऑगस्टपूर्वी संयुक्त अरब अमिरातीसाठी (युएई) रवाना होऊ शकत नाही. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा संघ अबूधाबीला 10 किंवा 12 ऑगस्टला रवाना होणार असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती.
एका फ्रेंचायझी अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले, ''आम्हाला आयपीएल जीसीच्या मेलमध्ये कळवण्यात आले आहे, की आम्ही 20 ऑगस्टनंतर युएईला रवाना होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणी तेथे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
क्रिकेटच्या पुनरागमनासाठी बीसीसीआयने एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) जाहीर केली. या एसओपींमुळे राज्य क्रिकेट संघटनांना क्रिकेट क्रियाकलाप पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. परंतु, प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी खेळाडूंना संमती फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागेल.
"आम्हाला अद्याप एसओपी मिळालेला नाही. परंतु आम्हाला तयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि उद्यापासून व्हिसा प्रक्रिया सुरू होईल", असेही अधिकाऱ्याने सांगितले आहे.