नवी दिल्ली - आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी मंडळाने (एसीसी) यंदा होणाऱ्या एशिया कप टी-20 स्पर्धेच्या भविष्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि जय शाह उपस्थित होते. या स्पर्धेबाबतचा निर्णय तहकूब करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
यंदा सप्टेंबरमध्ये एशिया कप टी-20 स्पर्धा प्रस्तावित आहे. पाकिस्तान यंदा ही स्पर्धा आयोजित करणार आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाही.
“बोर्डाने एशिया कप 2020च्या आयोजनावर जोर दिला आहे. कोरोनाचा होणारा परिणाम पाहता एशिया कप 2020च्या संभाव्य आयोजनस्थळांच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली. योग्य वेळ आल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला'', एसीसीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
एसीसी बोर्डाची बैठक बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन पेपॉन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.