दुबई - देशातील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता बीसीसीआयने आयपीएलचा १३ वा हंगाम यूएईमध्ये स्थलांतरित केला. या स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. आयपीएलमधील सर्व संघ यूएईमध्ये दाखल झाले असून संघातील खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यानंतर त्यांना जैव सुरक्षित बबलमध्ये राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. या दरम्यान, प्रत्येक खेळाडूसह सहभागी स्टाफची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. बीसीसीआयने चाचणीसाठी वीपीएस हेल्थ केअर या संस्थेची नियुक्ती केली आहे.
आयपीएलसाठी यूएईला जाणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी याआधी करण्यात आली आहे. ज्याचा अहवाल निगेटिव्ह आहे त्यांनाच यूएईला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात खेळाडू, फ्रेंचायझी आणि स्टाफमधील कर्मचारींचा समावेश आहे. पण आता पुढील तीन महिन्याच्या काळात देखील यांची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. यात आयपीएल संबधित अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. स्पर्धेदरम्यान, २० हजाराहून अधिक चाचण्या केल्या जाणार असल्याचे वीपीएस हेल्थ केअरने सांगितले.
वीपीएस हेल्थ केअरने एक पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, आम्ही आयपीएल स्पर्धेसाठी योग्य सेवा देण्याबाबत बीसीसीआयशी चर्चा केली. यात सहभागी संघातील खेळाडू आणि स्टापची 'बायो बबल'मध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी चाचणी करण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेदरम्यानही प्रत्येकांची प्रत्येक पाचव्या दिवशी चाचणी केली जाईल.
दरम्यान, आयपीएलची सुरूवात १९ सप्टेंबरला होणार आहे. तर अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळला जाईल.
हेही वाचा - ''तू किमान 'इतके' बळी घे'', अँडरसनच्या विक्रमानंतर युवीचे बुमराहला चॅलेंज
हेही वाचा - कसोटी अजिंक्यपद : टीम इंडियाच्या अव्वलस्थानाला धोका; इंग्लंडची दमदार कामगिरी