नॉटिंगहॅम - भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला असून दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आले आहेत. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना बांगर म्हणाले की, शिखर धवनला दुखापत झाल्याने तो आगामी काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी के.एल. राहुल सलामीला फलंदाजीसाठी उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांगर पुढे बोलताना म्हणाले की, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळताना अनेकवेळा महत्त्वाची भूमिका निभावत संघाला योग्य समतोल साधण्यास मदत केली होती. तो यष्टीरक्षणाबरोबरच कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकत होता. सद्य परिस्थितीत शिखर धवनच्या अनुपस्थितीत तसाच समतोल राखण्याची जबाबदारी केएल राहुल याच्यावर आहे, असे त्यांनी सांगितले.
सलामीला फलंदाजी करण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज असून यासाठी भरपूर कौशल्याची आवश्यकता असल्याचेही बांगर यांनी सांगितले. दरम्यान, भारत विरुध्द न्यूझीलंड सामना पावसाने रद्द झाला आहे. भारताचा पुढील सामना १६ जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असल्याने त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.