ढाका - कोरोनाच्या मोठ्या ब्रेकनंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी देशभरातील विविध ठिकाणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) मैदानावर खासगी सराव सुरू केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, माजी कर्णधार मुशफिकुर रहीम, मध्यमगती फलंदाज मोहम्मद मिथुन आणि वेगवान गोलंदाज शफीउल इस्लाम यांनी मीरपूरच्या बीसीबी अकादमी मैदानात प्रशिक्षण सत्र सुरू केले.
नसुम अहमद, खालिद अहमद, नूरुल हसन, नईम हसन आणि मेहदी हसन यांनी बांगलादेशात वेगवेगळ्या ठिकाणी सराव सुरू केला. मिथुन म्हणाला, "आम्हाला चार महिन्यांच्या कालावधीनंतर फलंदाजी करण्याची आणि धावण्याची संधी मिळाली. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही घरी होतो, म्हणून सर्व काही थोडे अवघड वाटत होते. आशा आहे की आम्ही हळूहळू आमच्या लयीत येऊ."
बीसीबीने सांगितले, ''आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलनंतर सराव सत्राच्या पहिल्या टप्प्यासाठी चार जागा तयार करण्यात आल्या आहेत. खेळाडू अकादमीमध्ये धावण्याबरोबरच इनडोअर सेंटरमध्ये फलंदाजी करण्याव्यतिरिक्त जिम सत्रातही भाग घेतील. इतर तीन ठिकाणी फक्त धावण्याची आणि जिमची सुविधा उपलब्ध आहे."
गेल्या महिन्यात बांगलादेशचा माजी एकदिवसीय कर्णधार मशराफी मुर्तझा याशिवाय माजी खेळाडू नजमुल इस्लाम आणि नफीस इक्बाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.