ख्राइस्टचर्च - पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बाबरच्या जागी मोहम्मद रिझवान कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-२० मालिकेपूर्वी सरावादरम्यान आझमला अंगठ्याची दुखापत झाली. यामुळे तो टी-२० मालिका आणि त्यानंतर पहिला कसोटी सामना खेळला नाही.
हेही वाचा - विराटच्या संघाकडून खेळण्यास स्टेनचा नकार
रविवारपासून या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघाचे डॉक्टर सोहेल सलीम म्हणाले, "बाबरची दुखापत सुधारली आहे, परंतु अद्याप तो पूर्णपणे सावरलेला नाही. तो आमचा कर्णधार आहे आणि आमचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. वैद्यकीय संघ त्याच्या दुखापतीचा आढावा घेत आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या घरच्या मालिकेसाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे."
बाबर पाकचा सर्वात उपयुक्त खेळाडू -
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) कर्णधार बाबर आझमला वर्षातील सर्वात उपयुक्त खेळाडू म्हणून निवडले आहे. २६ वर्षीय बाबरची मर्यादित षटकांसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही निवड झाली आहे. बाबरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११०.५ आणि टी-२० क्रिकेटपटूमध्ये ५५.२च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. बाबरने यंदा ४ कसोटी सामने खेळले. यात त्याने ६७.६च्या सरासरीने ३३८ धावा केल्या आहेत.
पाकिस्तान संघ : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अबिद अली, अझर अली, फहीम अशरफ, फवाद आलम, हॅरिस सोहेल, इम्रान बट, मोहम्मद अब्बास, नसीम शाह, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, यासिर शाह , जफर गोहर.