सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघाला या मैदानावर विजयाची ४३ वर्षांपासून प्रतिक्षा आहे. दरम्यान, उभय संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना जो की अॅडलेडमध्ये झाला. तो सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला. यानंतर मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहलीशिवाय रहाणे बिग्रेड तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्मा संघात परतल्याने, भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. असे असले तरी, सिडनी मैदानावर भारतीय संघाचा कामगिरी निराशजनक राहिली आहे. भारताला या मैदानावर फक्त एक विजय मिळवता आला आहे. तोही १९७८ साली. बिशन सिंह बेदी यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने सिडनी मैदानावर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
भारताचा सिडनीमध्ये एकमात्र विजय
भारतीय संघ १९७८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व बिशन सिंह बेदी यांनी केले. उभय संघात जानेवारी महिन्यात सिडनी येथे सामना झाला. भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि २ धावांनी धुव्वा उडवला होता. विशेष बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियात भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.
अॅडलेड येथील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत चार सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात विजयी लय कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ दोन्ही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. उभय संघातील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाणार आहे.
हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, तिसऱ्या कसोटीआधी 'स्टार' खेळाडू मालिकेबाहेर!