सिडनी - ऑस्ट्रेलियाचा धाकड सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. अॅडलेड ओव्हल येथे १७ डिसेंबरला होणाऱ्या या सामन्यात वॉर्नर दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
हेही वाचा - बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन, कॅन्सरविरुद्धची झुंज संपली
सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) रंगलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात वॉर्नरला कंबरेला दुखापत झाली. म्हणूनच शेवटच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून वॉर्नरला वगळण्यात आले. ३२ वर्षीय वॉर्नरला पूर्णपणे बरे होण्यासाठी १० दिवसांचा अवधी लागणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) सुरू होणार्या दुसर्या कसोटी सामन्यात तो खेळण्यासाठी प्रयत्न करेल.
"मला वाटते की, अल्पावधीतच मी चांगली प्रगती केली आहे. सिडनीत राहणे आणि तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करणे माझ्यासाठी चांगले ठरेल. आता मला कमी दुखापत आहे'', असे वॉर्नरने सांगितले. बॉक्सिंग डे कसोटीपर्यंत वॉर्नर तंदुरुस्त होईल, अशी आशा ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केली आहे.