नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने यंदाची आयपीएल स्पर्धा भारताबाहेर घेण्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. आयपीएल मार्चमध्ये होणार होती. पण कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही लीग 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होईल.
राजस्थान रॉयल्सची डॉक्युमेंटरी 'इनसाइड स्टोरी'च्या स्पेशल प्रीमियरवर स्मिथ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांना म्हणाला, ''खेळाडूंना युएईच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. परंतु, ही समस्या होणार नाही. कारण प्रत्येकाला मैदानात परत जायचे आहे आणि चांगले क्रिकेट खेळायचे आहे. दुबईची परिस्थिती भारतासारखी किंवा वेगळी असू शकते. परिस्थितीशी जुळवून घेण्याची ही बाब आहे. काही खेळाडूंना तिथे खेळण्याचा आधीपासूनच अनुभव आहे.''
स्मिथ पुढे म्हणाला, "मला वाटते की खेळाडू चांगले क्रिकेट खेळण्यास उत्सुक असतील. अर्थात आयपीएल भारतात होत नसल्याने निराशा आहे. आम्हाला तिथे खेळायला आवडले असते. दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असल्याने खेळाडूंसाठी हे आव्हानात्मक असेल.''
दुसरीकडे राजस्थानचा सर्वात युवा खेळाडू रियान परागनेही आयपीएलच्या पुनरागमनाववर प्रतिक्रिया दिली आहे. पराग म्हणाला, "माझ्यासाठी हे दुसर्या वर्षासारखे आहे. मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. मला कशाबद्दलही विचार करायचा नाही आणि संघाकडून माझ्याकडून जे हवे आहे ते करायचे आहे. माझ्या सामर्थ्यानुसार मला माझा खेळ खेळायचा आहे."
परागने आयपीएलमध्ये सर्वात तरुण अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. 17 वर्ष आणि 175 दिवस अशी वय असताना दिल्ली कॅपिटल्सच्याविरूद्ध परागने अर्धशतक झळकावले होते.