ब्रिस्बेन - न्यूझीलंड एकादश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात कांगारुंनी ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने निर्धारीत ५० षटकांमध्ये ९ गडी गमावत २८६ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्हन स्मिथच्या शानदार खेळीच्या जोरावर विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ वनडे सामन्यांची ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने १०८ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल ४८ चेंडूत ७० धावांची वादळी खेळी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया ४४ षटकामध्ये २४८ धावांवर खेळत असताना पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईस नियमानुसार त्यावेळी ऑस्ट्रेलिया १६ धावांनी पुढे असल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले.