सिडनी - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकाचा दुसरा उपांत्य सामना रोमांचक ठरला. यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १३४ धावा केल्या होत्या. तेव्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे आफ्रिकेसमोर १३ षटकात ९८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, आफ्रिकेचा संघाला ९२ धावापर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने हा सामना ५ धावांनी जिंकला. आता विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होईल.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडीने ४.४ षटकात ३४ धावांची सलामी दिली. खाकाने हिली (१८) ला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने बेथ मुनीसह संघाचा डाव सावरला. नॅडीने क्लेर्कने ही जोडी फोडली. मुनी (२८) धावांवर परतली. यानंतर जेस जॉनासेन (१), अॅश्लेघ गार्डनर (०) झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. तेव्हा एक बाजू पकडून लॅनिंगने नाबाद ४९ धावा केल्या. तिला राचेल हायनेसने १७ धावा करत चांगली साथ दिली. अखेर ऑस्ट्रेलियाला २० षटकात ५ बाद १३४ धावापर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून क्लेर्कने ३ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३ षटकात ९८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीच्या षटकांत दक्षिण अफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निकेरक आणि लिझेल लीने सावध खेळ केला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना आफ्रिकेची अवस्था ५ षटकांत ३ बाद २६ अशी केली. त्यानंतर सुने लुउस आणि लॉरा वोल्वार्ड यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला.
सुने लुउसला २१ धावांवर बाद झाल्याने, ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. लॉरा वोल्वार्डने एकाकी झुंज देताना २७ चेंडूत ४१ धावा केल्या. मात्र, तिचे प्रयत्न अपुरे पडले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुटने २, जेस जोनासेन, सोफी मोलिनेक्स आणि डेलिसा किमिन्सने यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. नाबाद ४९ धावा करणारी ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग सामनावीर ठरली. विजेतेपदासाठी ५ मार्चला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.