कॅनबेरा - क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. ही मालिका ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रस्तावित होती. मंगळवारी सकाळी दोन्ही मंडळांमधील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
तीन सामन्यांची मालिका अनुक्रमे 4, 6 आणि 9 ऑक्टोबरला टाउनसविले, केर्न्स आणि गोल्ड कोस्ट येथे खेळवली जाणार होती. शिवाय टी-20 विश्वकरंडरक स्पर्धेपूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची मानली जात होती. मात्र, यंदाची टी-20 विश्वकरंडरक स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
ही मालिका रद्द झाल्यामुळे गोल्ड कोस्टवरील बिल पिप्पॉन ओव्हल स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय पदार्पण थांबले आहे. तसेच केर्न्समधील काजिले स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आणखी काही काळ थांबावे लागेल. या स्टेडियममध्ये 16 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्याचे अखेरचे आयोजन करण्यात आले होते.
यापूर्वी अनेक क्रिकेट मालिका कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र आता हळूहळू क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. यात श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत यासारख्या देशांचा समावेश आहे. याशिवाय. बीसीसीआयनेही आयपीएलची घोषणा केली आहे.