मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात, भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ४ सामन्याच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत पराभवासह ऑस्ट्रेलियाला आज एकाच दिवशी तीन धक्के बसले. भारताने पराभव केलाच, यासोबत आयसीसीनेही ऑस्ट्रेलियाला जबर दंड ठोठावला आहे.
भारताकडून पराभव
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या 'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी नमवत पहिल्या पराभवाचा वचपा काढला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. भारतीय संघाने हे आव्हान दोन गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७ चौकारांसह ३५ तर रहाणेने ३ चौकारांसह २७ धावा केल्या. या विजयामुळे भारताने 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्यला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
षटकाची गती न राखल्याने दंड
भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात षटकाची गती न राखल्यामुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या संघावर ४० टक्क्यांचा दंड लावला आहे. कर्णधार टीम पेनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित वेळेत दोन षटक कमी टाकल्या आहेत. यामुळे आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी ऑस्ट्रेलियाच्या टीमचे ४० टक्के मानधन कापले आहे. ही कारवाई आयसीसी आचारसंहितेच्या नियम २.२२ नुसार करण्यात आली आहे.
आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ४ गुणांचा फटका
आयसीसी विश्व कसोटी अजिंक्पद स्पर्धेत खेळत असताना, सामन्यात षटकाची गती कमी राखल्यास त्या संघाचे प्रति षटकामागे २ गुण कापले जातात. ऑस्ट्रेलियाने निर्धारित वेळपेक्षा २ षटक कमी टाकल्या. यामुळे त्यांचे ४ गुण कमी करण्यात आले आहेत. ही कारवाई आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नियम १६.११.२ नुसार करण्यात आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने त्याची चूक कबूल केली आहे.
हेही वाचा - तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का? शास्त्री गुरुजींनीं दिले 'हे' संकेत
हेही वाचा - 'वेलडन अजिंक्य...' सचिन, विराट, अमिताभसह इतरांनी केलं टीम इंडियाचे कौतुक