मुंबई - इंग्लंडमध्ये ३० मे पासून विश्वचषकास सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशानां विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. यातच प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी भारत विश्वचषक जिंकू शकणार नसल्याचे भाकित केले आहे. त्यामुळे विश्वचषकात भारतीय संघ आणि फॅन्स यांच्या पदरी निराशा हाती लागणार आहे.
ग्रीनस्टोन लोबो हे जगातील एक प्रसिद्ध ज्योतिषी आहे. २०११ आणि २०१५ च्या विश्वचषकात त्यांनी अचूक भविष्यवाणी केली होती. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. लोबो ज्योतिषीसोबतच एक लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
ज्योतिषी लोबो यांनी विराट कोहलीमुळे भारत २०१९ चा विश्वचषक जिंकू शकणार नसल्याचे भाकित केले आहे. ग्रीनस्टोन लोबो यांच्या मते, विराटचा जन्म १९८६ किंवा १९८७ साली पाहिजे होता. पण त्याचा जन्म १९८८ साली झाला आहे. त्याचे जन्मवर्ष विजयात आडवे येऊ शकते. लोबो यांनी या विश्वचषकाविषयीची भविष्यवाणी विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना फोन करून सांगतिली आहे.
लोबो यांनी सांगितले, की प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे ग्रह चांगले आहेत, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वचषक खेळणारी टीम विश्वचषक जिंकू शकणार नाही. शास्त्री यांचा चांगला कालावधी निघून गेला आहे. भारताच्या विजयात त्यांचे कोणतेच योगदान नसेल.
भारत हा विश्वचषक जिंकू शकला नाही, तरी पारंपरिक शत्रू पाकिस्तानचा मात्र नक्की पराभव करेल, असे भाकीत लोबो यांनी केले. लोबो यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीपर्यंत मजल मारू शकणार नाही. दोन्ही संघात १६ जून रोजी सामना होणार आहे.